Sunday, May 31, 2009

जुगनू...

गेले गेले सोडुनी क्षण सगळे मला..
राहिलेना रंग सोबतीला
तुझ्या त्या प्रितिचा पाऊस ना भिजला
माझ्या प्रेमाचा तो गंधही निजला

नजर ती होती शेवटची
भेट ती ही होती शेवटची
शेवट असा हा होईल केव्हा
वाटले नव्हते तेव्हा मजला...

एक हाकही नाही दिली तु
मागे वळुनही नाही पाहले तु
वाट पाहत उभा तिथेच होतो मी
पण कसेच काही ना वाटले तुजला...

एकच अश्रु पडला डोळ्यातुन
दुसरा डोळा कोरडा होता
त्याच क्षणी विचारले त्याला
म्हणे वेडेपणावर हसतोय तुला...

मग दोन्ही डोळ्यांचा फरक कळला
फरक तुझ्या न माझ्या प्रितीचाही कळला
मीच रान जाळलं सगळं मीच वणवा पेटवला
अन तुला फक्त तो अंधारी जुगनू वाटला...

कवि - सतिश चौधरी

Monday, May 25, 2009

पण...तु म्हणतेस म्हणून नाही...!

मी हि ताजमहल
तुझ्यासाठी बांधीला असता
अन् त्यासाठी कुणाचा
बळी घेतला असता ....
पण...तु म्हणतेस म्हणून नाही...!

मजनू बनून मी ही
झालो असतो वेडा
दगड मारले असते मलाही लोकांनी
अन् मग तु मध्ये आली असती...
पण...तु म्हणतेस म्हणून नाही...!

मी पण केले असते सर
शिखर उत्तुंग पर्वतांचे, तुझ्या प्रेमासाठी
मी पण बांधले असते घर
सागराच्या उसळणाऱ्या लाटांवरती ...
पण...तु म्हणतेस म्हणून नाही...!

चिंबचिंब भिजलो असतो
मी हि तुझ्यासोबत पहिल्या पावसामध्ये
ओल्या वाळूंवरती मग मी ही
तुझे नाव लिहिले असते…..
पण...तु म्हणतेस म्हणून नाही...!

मी ही तुझ्यासाठी चंद्रतारे आणिले असते
तुझ्या प्रकाशासमोर सगळे
मग मंद मंद वाटले असते…..
गुलाबाची ना सही
झेंडुची फुले मी हि दिली असती
पण...तु म्हणतेस म्हणून नाही...!

एक एक करुन क्षण सगळे
मी हि मोजले असते तुझ्यासाठी…
माझ्या अंगणात येण्याऐवजी
माझ्या अंगणातून जाताना
तुझी वरात मी हि पहाली असती ..
पण...तु म्हणतेस म्हणून नाही...!

हसत हसत डोळे पुसत
मग स्वत:शीच म्हणलो असतो
तु करण्यापेक्षा स्वत:चीच
थट्टा मी केली असती तर.....
पण...तु म्हणतेस म्हणून नाही...!

कवि:- सतिश चौधरी

Tuesday, May 19, 2009

धावाधावा सरपंच माही बकरी हारवली...

काल कुपापाशी
चरत होती छान
म्या म्या गायची
सरस्वती गान
पन एकाएकी
झाली हो गायब
काय करु आता
माही बोलती बंद झाली
धावाधावा सरपंच
माही बकरी हारवली...

ऐरंड्याची तिले लई
आवड होती भारी
पोरिसारखी माह्या आंगनी
नाचत होती न्यारी
आता काय करु सरपंच
पिल्लं तिचे बोंबलत आहे
आमची माय कुठं गेली
म्हणुन मले इचारत आहे

जीव दाटुन येते
ह्या मुक्या जिवापायी
धुंडून आना माही बकरी
तिच्या पिल्ल्यांपायी
काय करु आता
माही बोलती बंद झाली
धावाधावा सरपंच
माही बकरी हारवली...


कवि - सतिश चौधरी

अ ब ब ब.... क ब क ब

अ ब ब ब.... क ब क ब
येणार कधी कोण जाणे
नुसती वाट लावली मेल्यानं....
येरे येरे पावसा तुला देतो पैसा
पैसा होता खोटा
म्हणुन पाऊस झाला छोटा...
पिळुन पिळुन किती तो पिळणार आहे ...
गिळुन गिळुन किती गिळणार आहे...
नाही कळलं ना काही....
ना कळो...
पण एक लक्षात असु दे ...
तुच इथे आग लावली...
निदान तिला तरी विझु दे..
नाहितर.... ...... ......



कवि - सतिश चौधरी

शेवट आहे सुरवातीचा...

विश्वास ह्या मनाचा
एक ध्यास पंढरीचा
निवास ह्या जगाचा
एक श्वास अंतरीचा...

कधी पापण्यांत
दवबिंदु ओलतीचा
भरुन वाहे पाट
कधी थाट जिंदगीचा...

तो हर्ष तो स्पर्श
लवलेश त्या क्षणांचा
नितभर उरलेला
गुलकंद पाकळ्यांचा...

बालपण सुखपण
तारुण्यात वणवण
उतरत्या वयात चढे
चटका मावळत्या उन्हाचा...

एक सत्य नाही असत्य
पण खेळ जीवनाचा
गोल आहे दुनिया सारी
शेवट आहे सुरवातीचा...


कवि - सतिश चौधरी

Monday, May 18, 2009

प्रेम म्हणजे...

प्रेम म्हणजे सुगंध
प्रेम आहे वारा
कोण अडविल त्याला
कुणाचा नाही पहारा...

हे बंधन हे जाळे
कसे पकडतील त्याला
हा संथ सुर छेडित जातो
बंधनांच्या तोडुन तारा...

हि सरिता अथांग वाहे
तिचा प्रवाह सांगत आहे
कैद कसे करणार हे प्रेमजल
तुटेल हर एक बंधारा...

त्याच्या पंखांत आहे
झेप गगनाची
ना थांबेल कधी
अशी गती त्या प्रेमपाखरा...

कवि - सतिश चौधरी

Tuesday, May 12, 2009

यंदा लगीन करायचच आपल्याले...

अरेच्या मायला
होऊन जाऊदे कि
कोण घाबरतं कोण
तिच्या मायला
यंदा उडवायचाच
बार आपल्याले
चायला पुरती वाट
लागली जिंदगानीची
आता कायबी होवो
यंदा घोड्यावर
बसायचच आपल्याले
पन हिचार येते मनात
तिच्या मायला कशी
असन बे थे...
चायला आपल्याले
त नौकरीवालीच पाह्यजे
पन लेकाची डोक्यावर
नाचाली नाइ पाह्यजे
पन कायबी असुद्या
दिसाले एकदम फटाक
असाले पाह्यजे...
तिच्यामारी एक प्रॉब्लेम आहे
तिच्या गालावर
एक तिळ असाले पाह्यजे
काहीबी असो पन यंदा
लगीन करायचच आपल्याले...

कवि- सतिश चौधरी

Friday, May 8, 2009

आज पुन्हा ....

आज पुन्हा
जगण्याचं वेड आहे
आज पुन्हा
लढण्याचं बळ आहे
नको जाऊ
मध्येच सोडुन
तुझ्याशिवाय अधुरा
माझा खेळ आहे..
मांड एक डाव
आज पुन्हा
लपंडाव नको
होऊ देऊ
तुजवर विश्वास आहे
घर कि अंगण
तुझे न माझे
हा संसार सगळा
आपला एक मेळ आहे...


कवि - सतिश चौधरी

ओव्हर आणि आऊट..!!!

एक दोन तिन...
ढिश्याव ढिश्याव....
खट खट डुग डूग..
भुर्र ....भुर्र
ढ्याण्ट ढ्याण...
एकसाथ... सावधान..

लेफ्ट राइट लेफ्ट
ढिश्याव ढिश्याव....
टन टन टन...
अल्फा म्याव म्याव
उल्का काव काव...
ओव्हर आणि आऊट..

धुळधुळ... धुळधुळ
टिक ... टिक ...
घु.....ऊं......ग
किच्च.... किच्च...ढग...
स्टॉप.......



कवि - सतिश चौधरी

Thursday, May 7, 2009

आता वेगळा अपुला बंध...!

मज खंत वाटे अनंत
जीव लागे हा एकांत
ओसरुन सर गेली
मरुन गेलो मी जिवंत...

हसऱ्या नयनांची कधी
धुडवड रंगीत होती
त्याच ओल्या कडांवरती
आता अश्रुंचे लाट बेरंग...

इवल्याशा मुठ्ठीमध्ये
वेळ न कैद झाली
अनवानी पावलांची ही
परिक्षा सावलीपर्यंत...

एक निर्जन रस्ता हा
आगीत न्हाहलेला
खरच कुठतरी चुकलय
म्हणुन झाला प्रेमभंग...

पण कोण वळून पाहणार
मागे रस्ता विसरलेला
वाटा तुझ्या वेगळ्या
आता वेगळा अपुला बंध...



कवि - सतिश चौधरी

Tuesday, May 5, 2009

आग लागो ह्या जगाला......

आग लागो ह्या जगाला
मग कोणीतरी य़ेईलच
पाणी घेऊन विझवायला
अहो असं नाही म्हणायचं
काहि पण बडबडता राव
असं नाहि लिहायचं.......

मग भुकंप होवो
धरणी नाचेल ता ता थैया
अहो काय पण बोलता राव
असं अभद्र नका बोलु भैय्या..
मग सुनामी येवो
अन् डुबून जावी सारी दुनिया...

अहो असं काय म्हणता सतिशराव
काही वेड तर नाही ना
लागलं तुम्हाला राव
मग असं होवो ह्या जगाची धुरा
भारतीय नेत्यांच्या हाती येवो
मग सांगा कोण वाचवेल ह्या दुनियेला

आता तर आम्ही
काय बोलावं राव
तुम्ही तर गडावरचा दोर कापला
अन् म्हणता मारा उड्या
तुम्ही पण ना राव......!

कवि - सतिश चौधरी

Saturday, May 2, 2009

आब तं वो इ मालिक सं....!

आबं तोकं का कहू
लई ऊन ताप रयस
मकं पानी पानी भयसं
अ मा देनी भाकरी लवकर
खेत मा जाबो सकार सकार
नइ तं लाइन चालली
जाये पसन...
बा को कह दे
म्या नांगर ले जाउन
कुंपन निंदबाको सं
मिरची बी लई बाडी
सकार उकी तोड करनी लागे
अ मा बता न...
औंदा का परनू ज्वारी क बाजरी
मालूम नाय बारीस
होस कि नाय
पसन का करनू
मकं काय बी
समज मा ना आयरो...
आब तं वो इ मालिक सं....


कवि - सतिश चौधरी

तळहातांच्या जखमांना

तळहातांच्या जखमांना
मलम कसे मी लावू
आठवणींच्या झुल्यांचे
झोके कसे मी थांबवू

प्रेमाची कुठे पंढरी
कुठे प्रेमाचे वारकरी
माझ्या प्रेमाच्या विठुरायाला
कोण्या मंदिरी मी पाहू
तळहातांच्या जखमांना
मलम कसे मी लावू
आठवणींच्या झुल्यांचे
झोके कसे मी थांबवू

ऊन्हातान्हाची पर्वा आता
ह्या वाटेवरती कसली
तुझेच नाम:स्मरण राही
अशी ना भक्ती दिसली
मनाच्या कोऱ्या पानांवरचे
ते नाव कसे मी मिटवू
तळहातांच्या जखमांना
मलम कसे मी लावू
आठवणींच्या झुल्यांचे
झोके कसे मी थांबवू

कवी:- सतिश चौधरी ...

जीवनसंगीनी......

बाहेत येता तुझ्या
विसावुन सांज जाते
हलकेसे स्मित तुझे
पुन्हा लढण्याला बळ देते...

हि जिवनसरीता अशी
जेव्हा दु:खडोंगरातुनी जाते
तेव्हा तुझ्या प्रेमाचा झरा
मनवाळवंटाला ओल देते....

मनाच्या सागरमंथनाचे तु
कसे सगळे विष पिऊन घेते
माझ्या वाट्याला अम्रुताची
कशी घागर ठेऊन जाते...

होय प्रिये भाग्य माझे कसे
उजळुन गेले अन् उजळत जाते
तुझ्यासारखी जीवनसंगीनी लाभली
मला कुबेराहुनही धन्य वाटे...

कवि - सतिश चौधरी

दिसली मला...अशी ही भारतमाता… “

“ दिसली मला...
अशी ही भारतमाता… “

दिसली मला
अशी ही भारतमाता
जराजीर्ण झाली ती
काय करावे असे झाले तीला आता
उम्बरठ्याहून तिच्या
सुर्यहि बुडताना दिसतो
पण येणाऱ्या सकाळला
कालचाच रन्ग असतो….
दिसली अशी व्याकुळ भारतमाता
जिच्या ओटितुन अश्रू सान्डतात आता
क़ुणीही नाही त्याना पूसण्यासाठी
अरे विसरले तिला कु:स्वार्थासाठी
गन्धे राजकारण इथे माजले
समाजाची दैना झाली…
अमानुषतेचा पूर आला
अम्रूताची गोडी गेली………….1

दिसली मला
अशी ही भारतमाता
वाट जणू ती पाहत आहे
नव्या पदपावलान्ची
आस्था अजूनी आहे तिला
एखाद्या अवताराची…
विश्वासही ना बसत आता
हिच का ती भारतमाता
जिच्या अन्गणामध्ये
शिवबासारखा पुत्र होता
सैरभैर नाचला तो
शौर्याने तयाच्या गाजला तो
वाजविले होते तयाने
शन्ख हे स्वराज्याचे
स्वराज्याचे रुप त्याने
केले होते सुराज्याचे
दिसली मला
अशी ही भारतमाता
जिच्या पायाला काटा रुतला होता………….2

खरच इतिहासही
आता धुन्दला वाटे
अहो हिच का ती भारतमाता
जिच्या भुमिमध्ये
भगतसिन्ग राजगुरु
अन् सुखदेव जन्मले
शौर्याची मिसाल
अन् क्रऩ्तिची मशाल घेऊन
मात्रुभूमीवर कूर्बान झाले..
टिपु सुलतानाची तलवार तळपली
इन्ग्रजान्चे रक्त पिण्यासाठी
झाशीची राणी ओरडून गेली
स्वातन्त्र्याच्या जिण्यासाठी
पण दिसली मला
अशी ही भारतमाता
जी मतिमन्द होऊन गेली आता………..3

हसावे कि रडावे ना समजे आता
अहो हिच का ती भारतमाता
जिच्या शौर्याच्या दागिण्यात
सुभाषबाबूसारखा नगीणा होता
रक्ताच्या बदल्यात स्वराज्य देईन
असा हिमतीने तो वदला होता
मात्रूभूमिच्या स्वातन्त्र्याला
अमरत्वाने लढला होता
अहो हिच का ती भारतमाता
जिने भिमरायाला जन्मीला होता
अन्यायाला प्रतिकाराची
मशाल भिमराया जाळून गेला
युगायुगान्चे परिवर्तन तो
एका जन्मात करुन गेला
दिसली मला
अशी ही भारतमाता
जिने बन्डाचा झन्झावात पाहिला होता……4

पण काय करावे कळत नाही
म्हणते आहे भारतमाता
हतबल झाले डोळे तिचे
हतबल झाले कान….
हतबल झाले हातपाय
हतबल झाला मान.....
तिची सभ्यता सन्क्रूती
आणि सम्मान…
कालही होता अन्
आजही आहे महान …
पण …..
पण तिच्याच कर्मविरान्नी
आता ठेवले तिला गहान...
ती तरी काय करणार
तिची मुले नालायक निघाली ..
गहान तर तिला ठेवलेच आहे
आता तिला विकायला निघाली..... 5

एकमेकान्वर वार करण्या
धुर्त कोल्हे लढू लागले
राजकारणाची रोटी शेकण्या
जनतेला ह्या जाळू लागले
पण कधी उघडणार डोळे
ह्या मात्रुभूमिचे ...
तिच्या डोळ्यातही हरामखोरान्नी
तेल ओतले बेईमानीचे
जात पात आणि धर्माचे
राजकारण हे भेदभावाचे
तेव्हाच तर त्यान्चे साधते
जेव्हा लोक मरतात कवडीमोलाचे
पण दिसली अशी ही भारतमाता
जणू कोमात ती गेली आता............6

कसेच सहन तु करते आहे
तरी अजूनही तू शान्त आहे
शौर्याचा काळ तु पाहीला
आता नामर्दानगीचा खेळ पाहते आहे
वारन्वार तुझ्यावर हल्ले झाले
आग दन्गा हाणामारी
खून आतन्क दादागीरी
सगळे सगळे तु सहन केले
चुपचाप तु राहिली भारतमाते
कधीच तु का बोलत नाही
सताड डोळ्यान्नी नुसती पाहते…
कधीच तु का रडत नाही
जणू आसवान्चे नाते तटले आहे
डोळ्यान्शी तुझ्या भारतमाते…..
खोट्या फुलान्च्या गन्धासाठी
काट्यान्ची परीक्षा का देते...
सुखाचा तू काळ पाहिला आता
बर्बादीची वेळ पाहते आहे
दिसली मला
अशी ही भारतमाता
जी नि:शब्द जणू झाली आता.........7

का कशासाठी का म्हणून
एवढी गप्प तू झाली आहे
तुझ्या इब्रतीचे धीन्दोडे
कशासाठी झेलते आहे
एकदा दोनदा अनेकदा
कितीदा हल्ले तू सहणार आहे
तुझ्या अपमानाचा बदला
सान्ग कधी तु घेणार आहे
गान्डु बनून आतन्क फैलवी
असे हे नामर्द आतन्कवादी
हा कसला जेहाद…….
आणि हे कोणते जेहादी
हिम्मत नाही त्यान्च्यात
समोरासमोर लढण्याची
हिच त्यान्ची रीत आहे....
अशा ह्या पाकड्यान्च्या
फैलत आहेत नाजायज औलादी...
कालपर्यन्त ते लपून बसायचे
आता घरात घुसून मारत आहे
विनयभन्ग तुझा केला
आता इज्जतही तुझी लुटत आहे
तरीही तु काहिच नको करु
तु तर नूसती बघत आहे
कारण तु तरी काय करणार
पुत्रच तुझे नामर्द बनले आहेत
दिसली मला
अशी ही भारतमाता
जणू वान्झोटीच ती झाली आता .......8

पण दिसली मला
अशी ही भारतमाता
अन्तरी जणू रडताना
वाट अजूनही सताड डोळ्यान्नी
एकटक ती पाहत आहे
एकतरी पुत्र होईल जागा
उद्धार तिचा करण्याला
एकतरी शुरवीर येईल जन्मा
बदला अपमानाचा घेण्याला
एकतरी मुल देईल हाक
ह्या मात्रुभूमिचे पारणे फेडण्याला
वाटच ती पाहत आहे
पाहताना दिसली मला .....9

ज्यान्च्या हाती सगळे आहे
रक्त त्यान्चे तापत नाही
रक्तात ज्यान्च्या गरमी आहे
ते काही करु शकत नाही
आता तर खरी वेळ आली आहे
खुप ड्रामा केला म्हाताऱ्यान्नी
आता तरुणान्ची जागा खाली आहे
उठारे जागे व्हा तरुणान्नो…..
बेरोजगार स्वत:ला म्हणता कशाला
देश उभारणीचे काम
तुमच्या हातात आहे…….

गरज आहे पुन्हा एका स्वातन्त्र्याची
गरज आहे आता खरी क्रान्तीच्या लढ्याची
हातात घ्या तलवारी आता
मुडदे पाडा आतन्क्याऩ्चे
झोडुन काढा दुश्मनान्ना
आतले आणि बाहेरचे..
हे बुड्ढे नुसत्या बाता करणार ..
ते काही करू शकत नाही
ते कसले लढणार…..
ते तर साधे जगुही शकत नाही
म्हणून म्हणतो तरुणान्नो
हातात घ्यारे सत्ता आता ..
तुम्हीच ह्या मायभूमिचे
खरे कर्तेधर्ते आता...
तुम्हीच तिच्या सन्मानासाठी
लढणार आहात…..
तुम्हीच तिचे उपकार आता
फेडणार आहात…….
हेच तर म्हणते आहे भारतमाता..
म्हणताना दिसली मला…………
म्हणताना दिसली मला…………10

कवि: - सतिश चौधरी

मुंबई माऊली…… माझ्या मायेची सावली….

कल्याण डोंबिवली
दादर भांडुप
मुलूंड कांदिवली…
कोळ्यांची राही मच्छी जिथं
तिथं हि फळफळली….
मुंबई माऊली……
माझ्या मायेची सावली….

धावता धावता दम लागे
बस आणि लोकलच्यामागे
वेळेलाही मागे टाकूनी
मुंबापूरी हि जिंकून आली
मुलींची आहे गर्दी इथं….
मुलांची हि बोंबावली
मुंबई माऊली……
माझ्या मायेची सावली….

कितिही संकटं झेलून गेली
कधिही ना ही थांबली
चंद्रताऱयांची वरात इथे
बेमौसमी बरसात इथे
कधी होळी-रंगपंचमी
कधी गोऴ्यांची भयानक रात इथे..
तरीही कधी ना ही भ्यायली…
मुंबई माऊली……
माझ्या मायेची सावली….

कवि: - सतिश चौधरी

सावली प्रेमाची...!

माझ्या मनाची फुलराणी
फुल गं प्रेमाची फुलदानी
घेऊन ये तु ये जरा
हसऱ्या ओठांचा मोगरा….

माझ्या जीवाला दे गं तु
आंब्याचा तो मोहर
ऊन्हातान्हाची सैर ही
सावली दे तु क्षणभर….

आला वसंत डोलत
झोप दाटली पानाफुलात
मला ही विसावु दे थोडी
तुझ्या प्रेमाच्या बाहेत...

लागली चाहुल वेलींना
कुणीतरी आलयं गं
तु पण कानोसा घे जरा
प्रेम प्रेमाच्या मिठीत.....

कवि - सतिश चौधरी

पक्षी उडूनी गेले …….!

पक्षी उडूनी गेले…. घरटे सोडुनी गेले…
जाता जाता म्हणूनी गेले…..
आता कुणाला गाशील गीता…. !! ध्रु !!

घरटे प्रेमाचे बांधीले कुणी
प्रेमाला आता बांधीले कुणी
पक्षी नाही घरट्यात
प्रेम नाही प्रेमात
कुठे आली ही आपली कथा....
आता कुणाला गाशील गीता….

शब्द संपले हसू थांबले
डोळ्यांतील माझ्या आसु संपले
वादळ उठले मनात
भरतीच्या सागरात
तुफान घेऊनी आल्या लाटा....
आता कुणाला गाशील गीता….

पक्षी उडूनी गेले…. घरटे सोडुनी गेले…
जाता जाता म्हणूनी गेले…..
आता कुणाला गाशील गीता…..

कवि - सतिश चौधरी

प्रेमाला प्रेम ....!!

प्रेमाला प्रेम
म्हटले तरी
प्रेम होत नाही....

तुझ्या नयनांत
तारे हजार असुनही
दिसत का नाही..

ओठांवरती तुझ्या
गुलाब पाकळ्या
गुलकंद त्यांचा होत नाही

आठवणींचे असेच
वादळ उठते
पाऊस कुठेच होत नाही

तु माझ्यात सजीव
आहे पण... नखापरी
निर्जीव होत नाही...

कवि - सतिश चौधरी

मिलनरात्र ...!

तुजसाठी पौर्णिमा उजळीत
अमावस्येला लपून बसतो
एक चंद्र वेडा नभी तुझ्या
कधी तुला चोरून बघतो...

रातराणीच्या फुलांनी सजली
आज आपली मिलनरात्र
दुर कुठे मंदिरी घंटा वाजे
सुर त्या प्रेमाचा एकूऩ बघतो...

नयनी तुझ्या कारंज्यांचे भावं
ओठांवरती गुलाबी प्रेमाचे दवं
हातात हळूच घेऊन हात
ह्रुदयी स्पंदने वाढवून बघतो...

नखशिखांत हि सुंदर प्रित
मनाच्या दऱ्याखोऱ्यांत भरुन घेतो...
अशीच राहो हि मिलनरात्र
पहाट थोडी अडवुन बघतो...

कवि - सतिश चौधरी

सजनी...

ये ना , ये ना , तु ये सजनी..... ये माझ्या ह्या अंगणी....
दे प्रेमाला माझ्या जरा...तुझ्या प्रेमाची ती रागिणी.... !! ध्रु !!

तुला पाहुनी तुला पाहुनी
तुझ्या प्रितिच्या मनी राहुनी
तुझ्या संगती रंग रंगती
तु्झ्या भोवती फुले गंधती
झालो वेडा मी तुझ्यासाठी
प्रितिच्या फुला तुझ्यासाठी
चंद्र वेडा जसा चांदणी....
स्थिती आहे तशी ह्या मनी...

हवं आणखी काय, मला गं प्रिये
जन्मोजन्माचं हे नातं आहे
तु लेखनी माझ्या मनाची प्रिये
प्रेमाची कहानी लिहून दे
देखणी तुझी हर एक अदा
अदांवरती तुझ्या झालो मी फिदा
प्रेमदेवतेची तु आरती
रुप तुझे आहे चंदनी....

ये ना , ये ना ,तु ये सजनी..... ये माझ्या ह्या अंगणी....
दे प्रेमाला माझ्या जरा...तुझ्या प्रेमाची ति रागिणी....

कवि - सतिश चौधरी

रडू नकोरे माझ्या मना……

रडू नकोरे माझ्या मना….. तु तर आहे दिवाना...
मरु नकोरे क्षणा क्षणा…… तु तर आहे दिवाना... !! ध्रु !!

स्वप्नं हे माझे वाळुंचे
पाण्यात विरुन गेले
ताजमहल हे प्रेमाचे
आगीत जळून गेले
हे का तु केले समजेना....

विसरून जा तिला तु रे
हि तर जगाची रित रे
जी गेली तुला सोडुनी
कशाला तिला आठवेरे
पिऊन घेरे आसवांना....

हेच का प्रेम असते
नाते दोन्ही जीवांचे
पण एकालाच असे
का मरण असते
कसे जगावे तुझ्याविना....

असंख्य प्रश्न मनी ह्या
काट्यांचे बाण तनी ह्या
का केले असे प्रिये गं
काय चुक झाली माझी गं
कसली सजा हि कळेना....

कवि - सतिश चौधरी

वो घुमा वो घुमा....

वो घुमा वो घुमा.... दे ताली दे गं प्रेमा
हो धुंद बेधुंद ..... कर गं सारा समा !!ध्रु !!

छनछन वाजु दे
पायलची झनकारं
थयथय नाचु दे
अंगांचे ते तारं
फेकुन ये टाकुन दे
आता सारी तमा...

सरसर वाहु दे
मदनाचं ते वारं
नयनी राहु दे
मस्तीची पाखरं
लोटुन दे जाळुन घे
लज्जेची ती सीमा...

भरभर येऊ दे
मनात एक पाव्हणं
नाचत फुलू दे
जीवाची रण अंगणं
उजळु दे होऊ दे
चंद्राची पौर्णीमा....

वो घुमा वो घुमा.... दे ताली दे गं प्रेमा...
हो धुंद बेधुंद ..... कर गं सारा समा....

कवि - सतिश चौधरी

... राघोमैना....

पोरी गं पोरी रुपाची परी
ऐक तुला मी म्हणतोय हाय
तुह्या मनाले इचारुन पाय
माह्या मनात बसलयं काय...

पोरा रे पोरा लफंट्या चोरा
मस्ती आली काय
माह्या बापाले सांगून पाय
तुह्या मनात बसलयं काय...

लय लय बिघडलं हे डोंबळं कारटं
वाकून बघतया डोळाही मारतं
माह्या जिवाची लोडशेंडींग
ह्याच्या नजरेनं केली हाय…..

लाजवंती गं तु माह्या प्रेमाची मैना
तुह्या राघोची कशी झाली बघ दैना...
माह्या मनाची उनाड कबुतरं
बघं कशी गटरगु करती हाय….

मोकाट रानात गाऊ जोडीनं गाणी
बनवीन तुले मी माह्या मनाची राणी
थोबाडित मारीन माह्या बाप तुले
तोडेल बघ तुह्ये कसे हातपाय….

बापाची धमकी कोणाले देते
तुह्या बापाले भितो काय
एकदा येऊ दे समोर त्याले
बघ कसा मी पळतो हाय…..

पोरी गं पोरी रुपाची परी
ऐक तुला मी म्हणतोय हाय
तुह्या मनाले इचारुन पाय
माह्या मनात बसलयं काय...

कवि - सतिश चौधरी.

होय प्रिये...! होऊ दे धुंद आज मनाला ...

होय प्रिये..
होऊ दे धुंद आज मनाला
वेडं होतयं ते .. होऊ दे
नको अडवू त्याला ..
जातयं ते दुरदूर..
त्या आठवणींच्या गावी
बघु दे आज त्याला
त्या गावातली झाडफुलं
बघ ना पोहचलाय तो...

दिसली त्याला करकरणारी
भर उन्हाची दुपार
उनाड रस्ते , चुपचाप
जणु त्याचीच वाट त्यांना…
अधुनमधून पाखरांचा
तो चिव चिव चिवचिवाट
बघ ना पोहचलाय तो...
आज त्याच्या गावा

हळुहळू चाललायं रस्त्याने
नजर शोधत आहे कुणाला
आणि दिसलयं त्याला
माझं घर... ते जांभुळाचं झाड
अन् मग हळुच
उर तुझा दाटुन आला..
बरोबर आहे आठवलयं तुला
तुझ्या डोळ्यांसमोर सगळं
चित्रं उभं राहीलयं

दिसतयं आज तुला………...
तुझ्या सायकलच्या मागे मागे
मी भर उन्हात धावतांना
अन् मग गावाबाहेर
त्या आंब्याच्या झाडाखाली
बसलो आहोत आपण
नाहिच आवरलं तुला
म्हणुन तु रागानं विचारलेलं
एवढ्या उन्हात काय गरज होती
कशाला मला बोलावलं

हळुच मग मी मुठ्ठी खोलुन
ती जांभुळं तुला दिली
अन् आता तुला पुन्हा
मनाला आवर घालता येईना..
मग गोंधळलेले डोळे तेव्हा
नकळत पाझरुन गेले
माहीत आहे…
खुप गहिवरून आलयं तुला
जसं आज पुन्हा झालयं तुला..

होय प्रिये..
होऊ दे धुंद आज मनाला
वेडं होतयं ते .. होऊ दे
नको अडवू त्याला ….

कवि - सतिश चौधरी

अन् आंधळा मारतो डोळा...!

कशी ही दुनिया आली बघा
उलटी फिरु लागलीया बघा
गम्मत शंब्दांची भारी हो
कसा होतो लाल रंग पिवळा
ऐश्वर्या म्हणजे ऐश हो
तर मजा मारणे नव्हे ...
बिग बि म्हणजे बच्चन हो
तर बोलबचन नव्हे ...
मग सांगा कसे म्हणाल हो
गुटखा म्हणजे काय हो
जसं पो म्हणजे पळा...
अन् आंधळा मारतो डोळा...

सि म्हणजे सिगरेट नव्हे
तर सि म्हणजे बघा हो
शी म्हणजे शी नव्हे
तर शी म्हणजे ती हो
बघा किती गोंधळ माजतोय हो
ह्या शब्दांच्या नादी हो
आता काय करावे सांगा
कुणीतरी ही गुत्थी सोडा
माणुस जरा जास्तच
शॉर्टकट बघा वापरी हो
बाटलीच्या संगे पाण्याऐवजी
त्याला पाह्यजे जसा सोडा...
अन् आंधळा मारतो डोळा...

एका डोळ्याच्या आंधळ्याचा
भरोसा नसतो काही
तशीच माणसाची जीभही
जणू अर्धी होत चालली
पुर्ण शब्दांचे रुप
बघा किती छान वाटे
अनं शॉर्टकट शब्दांचा वापर
जणु मुक्या बैलांचा पोळा...
काय बोलावे आणखी यावर
नुसती गंमत बघावी हो
बनूनी येडा कि खुळा...
अन् आंधळा मारतो डोळा...

कवि - सतिश चौधरी

पाऊस प्रतिक्षेचा...!

पाऊस प्रेमाचा बरसून गेला
पण तुझा मोरपिसारा फुलणार कधी
इंद्रधनुही तो तरसून गेला
पण त्याच्या रंगात तु रंगणार कधी..

चंद्रताऱ्यांची वरात आता
ह्या मनात नाचुन गेली...
तुझ्या नजरेची बरसात मला
आज पुन्हा भिजवून गेली
वाराही प्रितिचे गाणे गाऊन गेला...
पण त्याचा सुर तु ऐकणार कधी...

दिवसामागुन दिवस गेले
महिने गेले…किती वर्षही निघुन गेले...
प्रतिक्षेच्या काळरातांनंतर
गुलाबी आगमन तुझे होणार...
रातराणीच्या फुलांनी आसमंत धुंदीला
पण मनपाकळ्यांना तु गंधणार कधी....

प्रेम जिवना ....

प्रेम जिवना ....
ये आता जरा
माझ्या मनीच्या घर अंगणा...
स्वर्गसुंदरा ....
फुल आता जरा
जाईजुइच्या मधचंदना..

प्रेमात एकांत असावे
दोघांचेही मनं शांत असावे
कुणी हसावे कुणी रडावे
रडता रडता पळत सुटावे
पळता पळता काटा रुतावा
काट्याचे ते दर्द सहावे
सहता सहता पुन्हा रडावे
रडता रडता थोडे हसावे
अशी असते हि प्रेमवंदना
कुणी जाणीयले मर्मबंधना.....

प्रेम जिवना ....
ये आता जरा
माझ्या मनीच्या घर अंगणा...
स्वर्गसुंदरा ....
फुल आता जरा
जाईजुइच्या मधचंदना..

प्रेम जाणीयले
कुणी नाही अजुन
दोन जिवांचा हा
मेळ जुळतोय कुठून...
देहामध्ये ह्रुदय असावे
ह्रुदयाला त्या पंख असावे
पंखांवरती बसूनी जावे
बसता बसता उडूनी जावे
उडता उडता खाली पहावे
पहाता पहाता पडुनी जावे
पडूनी जाता जख्मी व्हावे
जखमांचे ते दर्द सहावे
सहता सहता पुन्हा रडावे
रडता रडता थोडे हसावे...
अशी असते हि प्रेमवंदना
कुणी जाणीयले मर्मबंधना.....

प्रेम जिवना ....
ये आता जरा
माझ्या मनीच्या घर अंगणा...
स्वर्गसुंदरा ....
फुल आता जरा
जाईजुइच्या मधचंदना....

कवि:- सतिश चौधरी

भजन...!!

माऊली माऊली
विठु माझी माऊली
चंद्रभागेच्या तीरी
उभी देव बाहुली...

सावली सावली
भक्तांची हि सावली
टाळम्रुदुंगे गजर
मन-कर्ण पावली...

धावली धावली
रंजल्या गांजल्या धावली
क्रुपा राहो देवा
आर्त हाक मारली...

कवि- सतिश चौधरी

येगं येगं प्रिये ....

येगं येगं प्रिये
माझे मन तुला पुकारे
देगं देगं प्रिये
नयनांचे इशारे…

रुप तुझे मनी धरले
डोळ्यांनी माझ्या पाणी भरले
डोळे माझे पाणावले
आठवणी ने तुझ्या गं प्रिये….

प्रेम मी खरेच केले
मी गं तुला सारे अर्पिले
रडु नको तु सांगीतले
पण मी ना ते अश्रू रोकले….

ये आता लवकर ये
माझ्या प्रेमाच्या स्वर्गामध्ये
तुझ्यासाठी मी आणियले
श्रावणाचे ते गं झुले….

कवि - सतिश चौधरी

प्रेम कर… ही दुधसाखर….!

पर्वतांच्या रांगा त्या
सागराच्या लाटा त्या
म्हणे लाटांवरती बांध एक घर
प्रेम कर… ही दुधसाखर…. !!ध्रु!!

झुला…. झुला झुलावा
प्रेमाचा तुरा डोलावा
ओला… ओला आहे हा
प्रेमाचा गर्द ओलावा
सांज होइल जशी
आठवण येईल कुणाची तरी
रूप तुझ्या मनी
बसले असेल कुणाचेतरी
आठव तिचा चेहरा डोळे मिटून जरा
आठव त्याचा चेहरा डोळे मिटून जरा
मग तुपण म्हणशील क्षणभर ....
प्रेम कर… ही दुधसाखर….

मेला… मेला आहे हा
मिलनाचा मेला रसीला
प्याला… प्याला आहे हा
मदनाचा प्याला नशीला
घोट घेशील जशी
नशा येईल तुलाही तशी
ओठ ओठांपाशी
थांबून जाईल क्षणांच्यासाठी
थरथर होईल आता अंगामध्ये तुझ्या
सरसर वारा वाहे मनामध्ये आता
म्हणते लाजेने तुझी नजर...
प्रेम कर… ही दुधसाखर….

कवि- सतिश चौधरी

एकदिवस जनी राया कॉलेजात गेली .....

एकदिवस जनी राया कॉलेजात गेली
कॉलेजची दुनिया सारी बदलुनच गेली..
भिंतींना कॉलेजच्या घाम लई आला
रस्त्यांना तिला पाहुन पुर हो आला..
कॉलेजच्या पोट्यांमध्ये स्पर्धा सुरु झाली
सगळीकडे जनीची चर्चा सुरु झाली…….

जनी जशी चाले तिच्या पायी घुंगरु वाजे
तिला पाहणाऱयाला ति दुरुन पाणी पाजे
अर्काट होती अदा तिची बोल अम्रुतवाणी
ओठांवरती तिच्या होतं नारळाचं पाणी
जनीच्या मागे मागे पोट्टे लई लागे
भाव खाऊन जनी मग पुढे पुढे भागे ......

जनीचे नखरे तसे होते लई जोरदार
प्रिंसिपल ते चपराशी फ्यान होते तिचे फार ..
अकाऊंटंट आणि लायब्ररियन धडकी मनात घेई
दरवाज्यातला गार्ड पहले तिले सलाम देई..
सगळ्या पोरी आता…. तिला जळु लागल्या
मास्तरीनाही आता तिची …नक्कल करु लागल्या ...

जनीचा बाप आता चिंतातूर झाला
जनीच्या वागण्याने धडधड होई त्याला
माय तिची म्हणे करुन टाका यंदा
गळ्यात टाका तिच्या आता लग्नाचा फंदा
पण जनी म्हणे फंद्यात ह्या पडणार नाही
अजूनतरी तिन बरीस लगीन करणार नाही

एकदिवस जनी राया कॉलेजात गेली
सांज होऊन गेली तरी वापस नाही आली
सगळीकडे धोक्याची घंटा आता वाजली
जनीच्या बापाला तर होश नाही राहिली ..
कोणीतरी हळूच त्याला वार्ता हि दिली
प्रिंसिपलच्या ड्रायव्हरसोबत जनी पळूनच गेली...
प्रिंसिपलच्या ड्रायव्हरसोबत जनी पळूनच गेली...

कवी : - सतिश चौधरी

सांजसकाळी ....मनात…..

चंचल वारा धरणीतळा
खोडकर चंदा नभात रे
सांजसकाळी सजना माझ्या
राहतो तु मनात रे…..
धरणी अंबर पर्वत सागर
दिसते तु फुलात गं
सांजसकाळी सजनी माझ्या
राहते तु मनात गं…..

वारा वाहतोय जसा झुला झुलतोय जसा
तु राहतोय तसा अंतरी मंदिरी
नदी वाहते जशी गाणी गाते जशी
तु दिसते तशी लाजरी सुंदरी
पाऊस पहिल्या सरींचा आला
पडतोय थेंब जसा पाण्यात रे
सांजसकाळी सजना माझ्या
राहतो तु मनात रे…..

काय जादु तु केला
स्पर्श हळूच झाला
अंगअंगाने तुझ्या जसा
देह माझा हा चुंबीला
कुणी ऐकेल कुणी बोलेल
हळूच सांग कानात गं
सांजसकाळी सजनी माझ्या
राहते तु मनात गं....

कवि - सतिश चौधरी

सकाळी सकाळी रेल्वेरुळापाशी…..

सकाळी सकाळी रेल्वेरुळापाशी
बैठक दिसली भरलेली…
रोजचा नित्यक्रम त्यांचा
कुणीच रजा ना घेतलेली……

कुणीच काही बोलत नाही
कुणीच काही ओरडत नाही
अगदी शिस्तीचे पालन करीत
मंडळी रांगेत बसलेली…..

लोकल येताना पाहुन आता
हळूच डोळे मिटलेली
ट्रेनमधील पुरुषमंडळी
थोडी मंदमंद हसलेली…..

एवढ्यातच कुणीतरी त्यांना
मोठ्याने हाक दिलेली..
पण काहिच प्रतिसाद नाही
जणु समाधि त्यांना लागलेली……

दरवाज्यातील बायामंडळी
हळुच आता लाजलेली...
अशीकशी धीरगंभीर
चर्चा तेथे सुरु आहे
स्तब्ध राहुन कुणाला
श्रद्धांजली ते देत आहे

एवढ्यातच दरवाज्यातील
एक खुळचट माणुस बोलला
अहो निवडणुका जवळ आल्या
राजकारणाचा विषय तेथे चालला
कोण कुठे बसणार आता
जणु जागावाटप चालला

म्हणून मनात विचार आला
राजकारणी आणि ह्यांच्यात
एक समानता तर दिसलेली..
आपल्याला कुणीच पाहत नाही
समजुन डोळे त्यांनी मिटलेली..
राजकारण्यांनी तर लज्जा विकलेली...
असहायतेवर नशिबाचा भडीमार दिसे...
अशी गरिबीची व्यथा तिथे दिसलेली...

सकाळी सकाळी रेल्वेरुळापाशी
बैठक दिसली भरलेली……
रोजचा नित्यक्रम त्यांचा
कुणीच रजा ना घेतलेली……..


कवी:- सतिश चौधरी

पण... माणुस...!

हिरवळ पाहली, भाजलेली माती दिसली
गारांचा पाऊस पाहिला वाऱ्याची गाणी दिसली
तरीपण तळपणाऱ्या ह्या धरतीमधूनी
माणुसकीचा एक कणीस उगवला नाही
सगळं काही पाहिलं इथं मी
पण मला माणुस दिसला नाही.......

रस्त्यामधूनी चालताना पायाच्या भेगा दिसत होत्या
लोकलमधूनी गाताना त्या बाहुल्या रोज भेटत होत्या
कुणि एक रुपया कुणि आठआणे तर कुणि काहिच नाही
भिकारड्यांची रीत हि सगळे असेच म्हणत जाइ..
अरे हेही माणसे असती याची कबुली होत नाही
वारे भगवंता, सगळं बनवलं तु पण माणुस बनवला नाही….

जसे नयनी पाहीले तसे मनी राहिले
आपले बंध आपल्याशी थोडावेळ गुंफत राहिले
ना भाऊ ना मित्र , ना पिता ना पुत्र
सगळे कसे जणू वाटे पाण्याचे दिवे लागले..
वेळ येताच वेळ जाताच कुणासाठी कुणी थांबत नाही
वेड लागताना दिसे मनाला पण माणुस दिसत नाही ….

अहो हेच का जिणे असते पैशांच्या तुकड्यांमागे
चालला विसरत स्वत:ला माणुस माणसांच्या गर्दीमध्ये
ना भ्रांत कशाची , ना शांती मनाची त्याच्या जीवा जाता
कोण मरतय मला काय घेणे, मी जगतोय हेच खरे आता
हसण्याच्या नादामध्ये त्याला रडण्याची भिती नाही
डोळे तरसले पाहण्या माणुसकीला पण माणुस दिसला नाही .....

पाप करूणी जिवनभर म्हणे निष्पाप ठरवी एक डुबकी
गंगाजळी जरी न्हाहले तरीपण मनात किती घाण डबकी
वस्त्र शुभ्र अंगावरती, हातात सोनकळा अन् ओठात स्मित हास्य
देवाला दान कोट्यावधी , काळधन लपविण्या असं हे गुप्त रहस्य
देवच आता भागीदार म्हणुन पापपुण्याची तमा ही भासली नाही
देव ही दिसला दानव ही दिसला इथे, पण माणुस दिसला नाही.....

कवि - सतिश चौधरी.

फ्युज उडाला……..!

फ्युज उडाला मनाचा
अन् तुझं जनरेटरही बंद पडलं
युपिएसवरती सिस्टीम चालु
अन् ऱ्यामचं आता डोकं फिरलं…

काय करावं काही कळेना
प्रेमाची बुटिंग बंद झाली
कशातुन बुट करू
सिडिरोमही जीवाचं बिघडलं….

कशीबशी जिंदगी हि
चालू आहे ब्याटरीवरती
मध्येच व्हायरस घुसला कुठून
सिस्टीम ही जाम पडली….

वायरसलाच यान्टीवायरस
समजुन कसंतरी सुरू आहे
वाटे फेकुन द्यावी जुनी मशीन
नविन सिस्टीमचा शोध सुरू आहे….

कवि – सतिश चौधरी

कोंबडी भुंकाया लागली...... !!

कोंबडी भुंकाया लागली पहाटे
अन् कुत्रं करते कुकूच कु....
कसा हो जमाना आला बघा
नवराबायकोचं भांडण असं
चालतयं घरी खुपच खु.....

असली नुसती कटकट सारी
बायकौ करते वटवट भारी
ती पण कामी मी पण कामी
ना तीही कमी ना मीही कमी
म्हणे मलाच कसा भेटला तुच तु....

सकाळी सकाळी भांडणाशिवाय
आमचा दिवस बरा जातच नाही
वेगवेगळ्या ऑफीसात दोघेही कामाला
लंचही भांडल्याशिवाय धकतचं नाही
जेवताना लागे ऊचकी तिची ऊचुक ऊ....

सायंकाळी पुन्हा घरी परतल्यावर
तोंड एकमेकांचं पहावं लागतं
संध्येच्या शितलतेनं भांडणही थंडावू लागतं
हळुच तिच्या हास्यावरती प्रेम भरुन येतं
प्रेमात विलीन होते मग दिवसभराची ढिश्श्युम ढु.....

कवि - सतिश चौधरी

जय जय मायबोली ...

अर्धसावळे मर्दमावळे
जात कोळियांची
रक्षण करण्या जातो
माय मराठीची
शुर शिवबाचे
सैनिक हो आम्ही
जय जय मायबोली
जय जय मायभुमी ......

शब्द वेगळे अर्थ मोकळे
बोली वऱ्हाडाची
व्यंजन करते रंजन वाटे
गावरान शब्दांची
खानदेशाची ऐरणी
येते घेऊनी पर्वणी
जुळत जाई मराठमोळी
अलगद हि नाती…..

पुणेकरांच्या बोलीमध्ये
अवीट ही गोडी
कधी ना शंका कुशंका
मनात त्यांच्या हो थोडी
मराठी वैभव दाखवे सदा
कोल्हापुरची लावणी
वाटे मिरची लालतिखट
ही लावण्यवाणी……..

मराठीमाय रुप वेगळे
फुलपानांची पाती
पण वात्सल्याचा तिच्या
न तुटे झरा हा दिनराती
एकच आहे मायबोली ही
बोले ओली हि माती
सर्वांसंगे मनरंगे
जीवनगाणे हो गाती.......

कवि- सतिश चौधरी

बांधून घे लंघोटी तु .....

एक एक हात होऊ दे
पहलवानकिच्या दादा..
मिशा तुझ्या पिरगळून घे
रानटी दाखव अदा..

बांधून घे लंघोटी तु
नाहीतर सुटुन जाइल रे
बाया बघतील माणसं हसतील
नजारा पाहून रे….

पछाडून दे लाथाडुन दे
चिलटांची ती सभा
पकडून घे लकडून घे
हाडांचा तो मुरब्बा…..

लंघोटीचा काय भरोसा
परखून घे तु जरा
आवरासावरा करुन घे
तुझा सगळा पसारा….

अन् कुस्तीच्या मैदानात
मर्दानकिची तऱ्हा
अंगावरच्या मैदानावरती
वाहूदे घामाच्या त्या धारा…

पण लंघोटिचा नाळा
पाहून घे तु जरा
इज्जत नको घालवशील
माझ्या लंघोटी यारा…

होऊदे आभाळात
आता मोठ्याने गर्जना
मराठाकेसरी बनून तु
कर सर्वांना तुझा फिदा…..

एक एक हात होऊ दे
पहलवानकिच्या दादा..
मिशा तुझ्या पिरगळून घे
रानटी दाखव अदा..

कवि- सतिश चौधरी

सांग ना प्रिये ...

सांग ना प्रिये ..
सांग सांग ना...
प्रेम करणे आहे का गुन्हा..

सावली तु माझी
माझ्या मागे मागे
पावली तु अशी
हि सांज डुबती लागे..
परिक्षा नको घेऊ तु
धीर नको पाहु तु
ह्या चंचल मना ..
सांग ना प्रिये ..
सांग सांग ना...
प्रेम करणे आहे का गुन्हा..

ह्या निर्दयी जगताला
भ्यायचे कशाला
का प्यायचा आपण
विषाचा प्याला...
चिंता नको करु तु
पर्वा नको करु तु
ह्या सहजीवना...
सांग ना प्रिये ..
सांग सांग ना...
प्रेम करणे आहे का गुन्हा..

त्या अस्सल प्रेमाला
गमवायचे कशाला
का दयायचा आपण
हात दुश्मनाला
श्रद्धा नको सोडु तु
कल्पना नको करु तु
ह्या प्रेमाविना....
सांग ना प्रिये ..
सांग सांग ना...
प्रेम करणे आहे का गुन्हा..

कवि-सतिश चौधरी

“ तु मांडलेल्या संसाराची….. “

तु मांडलेल्या संसाराची आठवण आज आली
माझ्या जीवाच्या सगळ्या चिंधड्या करुन गेली……
हेच का प्रेम असते
नाते दोन्ही जिवांचे
पण एकालाच का मरण असते
मरणाच्या चितेवरती आज
आगही ओरडून म्हणाली
कसे जाळू तुला वेड्यारे
तुझी तर प्रेमात राख झाली….
तुझी तर प्रेमात राख झाली….
तु मांडलेल्या संसाराची आठवण आज आली
माझ्या जीवाच्या सगळ्या चिंधड्या करुन गेली……1

कसे जगावे कशासाठी
का रडावे कुणासाठी
आसवांचे नाते आता
संपले आहे डोळ्यांसाठी
तुला तर तमा ना भासली कशाची
चांदणी माझ्या प्रेमाची
मलाच अंधारात सोडून गेली….
मलाच अंधारात सोडून गेली….
तु मांडलेल्या संसाराची आठवण आज आली
माझ्या जीवाच्या सगळ्या चिंधड्या करुन गेली……2

तुझी वाणी खोट्या शब्दांची
कशाला मी ऐकली होती
तु तर सगळं विकून गेली
ह्या प्रेमाची किंमत अनमोल होती
कुणास ठाऊक तुझी काय मर्जी होती
माझ्या सुखाच्या छायेतसुद्धा
तुझ्या दुराव्याची उन्हं टोचून गेली…….
तु मांडलेल्या संसाराची आठवण आज आली
माझ्या जीवाच्या सगळ्या चिंधड्या करुन गेली……3

काय म्हणावे तुझ्या प्रेमाला
बदलत गेले ते घडीघडीला
चार दिवसही ना वाट पाहिली
जिवनाची तुझ्याही वाट लागली
काय मिळाले आता तुला
एक शब्द तु ना काढीला
मला मात्र मुकं करुन गेली.....
तु मांडलेल्या संसाराची आठवण आज आली
माझ्या जीवाच्या सगळ्या चिंधड्या करुन गेली……4

कवि:- सतिश चौधरी

आबा...! खरचं माह्य लइ चूकलं....!!

एकदिवस होस्टलवरती आबाचा
फोन मले आला
म्हने काबे पोट्या अजून तु
कालेजात नाइ गेला…
मी म्हनलो आबा
मी कालेजला गेलो होतो
पन अचानक रस्त्यामंधी
मेंढुक मले डसला…
आबा म्हने अबे लेका मच्छरा
तु मले बनवून राह्यला
आजपरेन मानसाले कधी
मेंढुक नाइ डसला…
मेंढकाचे काय दिस फिरले
उंदरं सोडून तो तुह्यासारख्या
चिलटाच्या मांग फसला….
आबा म्हने मंग
दवाखान्यात काऊन नाइ गेला
मी म्हनलो गेलो होतो
पन डाक्टर नाइ दिसला
आबा मंग संतापून
जोऱ्यानं मले बोलला
अबे मी तुह्या बाप अन्
तु मलेच शिकवून राह्यला
आबा म्हने कालेजमंधी
कोनता दिवा तु लावला
कालेजमधला तुह्या रिपोट
कालच घरी आला
तुहि माय सांगे
तु यंदाही फेल झाला….
मी म्हनलं आबा मी
अभ्यास लइ.. केला व्हता
पन परिक्षेच्या टायमाले
माह्या दिमाग चालत नव्हता
आबा म्हने माह्या बुढा
आंगठछाप व्हता
शाया सोडून मले तो
वावरात घालत व्हता
तरीपन कसाबसा मी
चौथीपरेन शिकलो
चौथीनंतर गावात पुढं
शिक्षनच नाइ होतं
मजबुरीनं मंग म्या
लेहनं सोडलं होतं
पन तु इंजीनेर व्हावं म्हनून
तुले शयरात आमी धाडलं
तुह्यासाठी रोजं आमी
किती खस्ता खाल्ल्या
तुह्या मायनं तुह्यासाठी
एकहि देउळं नाइ सोडलं
पन तु लेका असं
सारं मातीमंधी धाडलं…
तवा माहे डोये उघडले
मंग मी भरल्या डोयांनी म्हनलं
आबा मी उद्यापासनं
रोज कालेज जाइन
इंजिनीअर बनल्यावरचं
आता घरी येइन….
मनोमनी तवा म्या
लक्ष एक धरलं
आबासनी माफी मांगीतली
म्हनलो आजपरेन आबा
म्या खोटं लइ बोललो….
म्हनलो…….
आबा...! खरचं माह्य लइ चूकलं....

कवि - सतिश चौधरी

सांग फेडु शकशील हे ऋण...........!

दे माझ्या आसवांचे देणे..
दे ना...
मला माहित आहे
नाही देऊ शकत तु…
मग कशाला तुझे हे मागणे
माझ्या आयुष्याच्या
त्या वळणावर तुझे….

तरीपण घे तु
आणखी एक ऋण माझं
तुझ्या प्रत्येक हास्याला
माझ्या मनाचा
जीर्णोद्धार …. तसाचं राहु दे
कमीत कमी तुला...

आणि एक वचन घे पुन्हा
माझ्याचकडून कारण तुझी वचने....
नको नाही आठवायचं मला त्यांना
तुझ्या जगात माझी जागा
होती ... हक्काची…
आहे की नाही
हे तुच जाणतेस…

पण माझ्या मनात …माझ्या जगात
आणि माझ्यासाठी तु
ह्या जन्मीतरी अमर आहेस .... !
माहित नाही तुझ्यात
सध्या कोण जिवित आहे...
पण घे एक वचन
तुझ्यासाठी कितीतरी जन्म
मी पुन्हा पुन्हा मरणार आहे
सांग फेडु शकशील हे ऋण........... माझं …..!!!!

कवि - सतिश चौधरी

बाई मी गेली.....!

बाई मी गेली पाण्याला
घागर घेऊन विहिरीला
विहिरीच्या बाजुला दिसली बाटली
भुंगा डसला नी पळत सुटली….

बाई मी गेली शेतात
घेऊन शिदोरी हातात
कमीन्या दिवानजीची नजर फुटली
फेकलं काम नी पळत सुटली….

बाई मी गेली बाजारा
आली घेऊन मोगरा
रस्त्यात पोट्ट्यांनी गर्दी कुटली
मारली एकाच्या नी पळत सुटली…..

बाई मी गेली सिनेमाला
तिकिट काढून थिएटरला
चुकिचा सिनेमा मी डोळे मिटली
सोडला सिनेमा नी पळत सुटली…..

बाई मी गेली जत्रेला
सोबत घेऊन कुत्र्याला
रस्त्यात त्याला कुत्री भेटली
डोकं धरलं नी पळत सुटली……
डोकं धरलं नी पळत सुटली……

कवि - सतिश चौधरी

आठवते ना.....!!

अशा त्या चांदणी राता
मनात अगदी
घर करून बसलेल्या
तुझं ते लपून छपून
छतावरती येणं
अन् त्या दुधाळी चांदण्यात
तुझं ते रुप ऊजळत जाणं
जणू लावण्याचं देणं
मंतरलेल्या त्या क्षणांत
हळुच तुझं ते लाजणं
आठवते ना..
तुझ्या पैजणांची छनछन
तुझ्या कपाळी तो चंद्र जणू
तुझ्या सौंदर्याचं लेणं
चंदनापरी रुप तुझं
असचं फुलतं जाणं
आठवते ना.....
अन् मग सगळं जग विसरुन
फक्त तुझ्याकडे
माझं एकटक पाहणं
पाहता पाहता नकळतं
तुझ्या त्या काजळांच्या
रेषांचं भिजणं
मी मात्र निश:ब्द
अगदी भान विसरलेला
कसा वेळ निघून जायचा
कधिच समजायचं नाही
थोड्याचं वेळाने
तुझी जायची घाई
अन् माझं मग
एक एक क्षण मोजत जाणं
आठवते ना...
तुझं ते मधापरी अगदी गोडं हसणं
माझ्या जिद्दीला कंटाळुन मग
मध्येच तुझं रागावणं
शेवटी जसा जीव तुटत चालला
असं वाटून तुला निरोप देणं
आठवते ना....
पण त्या निरोपाला असायची
एक आशा पुन्हा भेटण्याची
असं समजून
मनाची समजुत घालणं
पण वाटलं नव्हतं कधीच
अशी तु चुपचाप भेटायला येशील
अन् मला कायमचा
हसरा निरोप देशील
अन् मग तुझं ते मला
विसरुन जायला सांगणं
आठवते ना...
नसेलही आठवत तुला
पण नाही विसरलो मी
ते प्रत्येक क्षण ते प्रत्येक कण
नाही विसरलो तुला
तुझ्या त्या आठवणींना
नाही विसरु शकलो तुझ्या
त्या प्रत्येक निरोपांना
अन् तरीही माझं वेडेपणाचं
तुला हे विचारणं
आठवते ना.....

कवि - सतिश चौधरी

क्षितिज हे प्रेमाचं ……!

नाही सांगु शकलो तुला
गोष्ट पानांत लपलेली
नाही विचारु शकलो कधी
प्रश्ने मनात ऊठलेली
आजही मनी विचार येई
अजुनही करत असेल तु
विचार माझ्या वेडेपणाचा
असा कसा बदलुन गेला
हा खेळ सावल्यांचा.......

वाटे दिसत असेल तु
आज चंद्राहूनही चंद्रमौळी
लाजत असेल पाहून आरशात
तेज स्वत:चे प्रेमभोळी
पण नाही करु शकलो कधी
स्तुति रुपाची तुझ्या भावलेली
हळुच वेळ वाळूंपरी हातामधूनी
सरकताच संपून गेला
हा खेळ शिंपल्यांचा.......

जीव एकवेशी टांगलेला
सुर्यकिरणांपरी काहूर माजलेला
सकाळी त्या सोनकळ्या वाटे
त्याच दुपारी काट्यांपरी रूते
सांज होताच गुलजार कोमेजलेला
वाटे पुन्हा पून्हा देहामधूनी
हा जीव माझा सांडलेला
रात्र होताच संपून गेला
हा खेळ चांदण्यांचा.......

नाही गाऊ शकलो तेव्हा
गाणी ओठांत दबलेली
नाही पाहू शकलो तुझी
स्वप्ने डोळ्यांत बसलेली
आज मनात विचार येई
विसरली असेल तु सगळंकाही
संसार सजवूनी सप्तसुरांचा..
पण अधुरा राहून गेला
हा खेळ संगीताचा.......

कवि- सतिश चौधरी

काय राव तुम्ही ......! एका शेतकऱयाची व्यथा .......

काय राव तुम्ही
वांग्याच्या धंद्यात
भरपुर कमावलं ....
अन् मिरचिच्या नादान
सारं शेतच गमावलं…

होत्याचं नव्हतं पेरलं
आयऱ्यात पाणि धाडलं
ऊन्हाचा चटका बसुन फटका
टोम्याटो पिकवलं….
अन् बाजारा नेऊन
सारं फुकट सांडवलं…..

लागवड केली होती
गोबीच्या पिकासाठी
वणवण झाली होती
खतांच्या बोरींसाठी
उठसुठ फेकलं बुडाला टेकलं
संत्र्याले गमावलं....

काय राव तुम्ही
वांग्याच्या धंद्यात
भरपुर कमावलं ....
अन् मिरचिच्या नादान
सारं शेतच गमावलं….

कवि - सतिश चौधरी

लंघोटी बांधून घे ....!!

लंघोटी बांधून घे
कोळ्यारे लंघोटी बांधून घे
बिनकाट्याची मासळी दे
कोळ्यारे भाजली मासळी दे……

सागरा जाऊन ये
कोळ्यारे मासळी घेऊन ये
बाजारा भावानं दे
कोळ्यारे मासळी भावानं दे……

कोळीराजा तु दर्याला जाइ
सागराच्या लाटा तुला पांघरुनी घेई
खारं पाणी हे चाखून ये
कोळ्यारे अम्रुता न्हाऊन घे…..

सोनी तुझी मासळी कोळीरे भारी
लज्जत तिची हि तिखट नी खारी
देशी तडकी मारुन ये
कोळ्यारे धडकी भरुन ये…..

कवि - सतिश चौधरी

गाढवाचं लगिन...!

अठरा वर्षाचा गाढव जुना
अहो पोरगी बघा ना
ह्याचं लगिन कराना
किती टेन्शन हो ह्याच्या मना
कुठे जीव लागेना
ह्याचं लगिन कराना

पौर्णिमेच्या चांदण्यात
हा झाडाखाली उभा ना
म्हणे सर्वांना सावलीत या
किती उन्हं तापतयं बघा ना
अशा शहाण्या गाढवाला
अहो पोरगी बघा ना

एवढ मोठं कुरण पाहुनी
चिंता होई त्याच्या मना
किती खायचं आहे अजूनी
म्हणून चरत राहेना
अशा मेहनती गाढवाचे
हात पिवळे करा ना

नमस्कार दोन्ही पायांनी
कसा करतो बघा ना
उभे राहेना मागे कुणी
करे फाइट बघा ना
अशा स्टाइलीश गाढवाला
अहो नवरी बघा ना

किती सहतो हो ह्यो यातना
कोणीतरी समजा हो आता
बिचाऱ्या गाढवाची वेदना
द्या हो प्रेमाची हाक कुणी
त्याला आराम करु द्याना
ह्याचं लगिन कराना

कवि - सतिश चौधरी

वळू...!

ये बघ ना... आलाय तो
अरे बघ की
टपक .. टपक चालु लागला
बघ मागे वळुन बघतोय

मेला कुठला...
जोऱ्यानं ओरडते गंगुबाई
कानाखाली वाजविन ना मी
बसशील बोंबलत....
चल पळ इथुन

आता अंगात शिरलयं वारं
हे बुजगावणं कुठलं न्यारं...
गुलुगुलू माझा
मिट्ठू बघा गातोय कसा...
हे हंबा बस कर की.... चल आता

कवि - सतिश चौधरी

..... कारण तुलाच शेपटी नाही......

धरती म्हणे माणसाला
म्हणून तु माझ्या घरातला नाही
कारण तुलाच शेपटी नाही...

असेच कैक वर्षांपु्र्वी
तु हमला येथे केला..
मी माझ्या अंगणामध्ये
तुला सांभाळूनी घेतला
पण माझ्याच लेकरांवरती
तु अन्याय सदा केला....
धरती म्हणे माणसाला
म्हणून तु माझ्या घरातला नाही
कारण तुलाच शेपटी नाही...

माझ्या माकडपोरांना
तु पुर्वज स्वत:चे म्हणीला
पण काहिच तुला कसे आठवेना
सगळे तु विसरुन गेला
म्हणे विकासाच्या प्रक्रियेत
तु शेपटी त्यागून गेला.....
म्हणून तु माझ्या घरातला नाही
कारण तुलाच शेपटी नाही...

अशाच एक एक खोट्या
कथा तु रचीत गेला
स्वत:च्या स्वार्थासाठी
इतरांना मारीत गेला
माझ्या सगळ्या लेकरांना
अजुनही शेपटी आहे....
म्हणून तु माझ्या घरातला नाही
कारण तुलाच शेपटी नाही...

किती शांती होती इथे
जेव्हा तु इथे नव्हता
माझ्या अंगावरती हिरवा शालू
अन् अंबर निळा होता
तु आला नी माझ्या जीवनाचा
रंग तु बिघडवून गेला.....
म्हणून तु माझ्या घरातला नाही
कारण तुलाच शेपटी नाही...

माझ्या सगळ्या मुलांना तु
घरातुन पळवून लावले
तेच खरे भुमिपुत्र
पण तु त्यांनाच हाकलून दिले
मुक आहेत माझी लेकरे
म्हणूनच तुला माज चढला...
म्हणून तु माझ्या घरातला नाही
कारण तुलाच शेपटी नाही...

अरे तु तर परग्रही आहेस
जा लवकर सोडून मला
कोण कुठला आहेस तु
फक्त मीच जाणते तुला
म्हणुन एलियंसला शोधतो कुठे..?
तुच तर एलियंस आहे....
म्हणून तु माझ्या घरातला नाही
कारण तुलाच शेपटी नाही...
..... कारण तुलाच शेपटी नाही......

कवि - सतिश चौधरी

चोरांच्या चक्कीमध्ये .... हे असेच चालू राहणार...!

चोरांच्या चक्कीमध्ये
जनता ही भरडु लागली
आल्या पुन्हा निवडणुका
पुन्हा गर्दी होऊ लागली
कालपर्यंत तोंड त्यांचं
कधी दिसलं नव्हतं..
आज पुन्हा काळं तोंड घेऊन
बेशरम दाखवे हात..
घड्याळ कधीची बंद पडली
दहा वाजून दहा मिनीटेच त्यात....
वेळ कधीची निघून गेली
पण हिची काटे ना पुढे जात.....

चिखल केला सगळीकडे
अन् म्हणे कमळ फुलेल पुन्हा
अहो पाण्यातही फुलू शकते
बिचाऱ्या कमळाचा काय गुन्हा..
पण चिखल केल्याशिवाय
तुमचं जमेल तेव्हा ना...
सायकल बिचारी काय करणार
नाचता येइना अंगण वाकडं
नेत्यांसंगे अभिनेत्यांची
वाकोल्या करती नौटंकी माकडं...

वाघ केव्हातरी गर्जायचा
कधी धनुष्यबाण चालायचा
पण ह्या जंगलात आता
शावक आले कितीतरी
कारण वाघ म्हातारा झाला...
केरळपासून हत्ती निघाला
दिल्लीची स्वारी करण्याला
माहित नाही कधी पोहचणार
रस्त्यात आता कुणाकणाला
कसा हा कुचलत निघाला...

विळा घेऊन डावे निघाले
जनतेची पिकं काढणार
नाहिच काही जमलं तर
सरकारला विळ्याने कापणार...
वा रे ही लोकशाही
अन् वा रे ही नेतेमंडळी
बाजारात दुकाने मांडली सर्वांनी
कोण जाणे कुणाचा माल खपणार ....

कधी धर्माचं कधी जातीचं
कधी भाषेचं कधी मातीचं
राजकारण म्हणे चालणार..
मरा तुम्ही असेच मरा
आम्ही मात्र रोटी शेकणार..
मेल्याशियाव ह्यांची
निव्रुत्ती होत नाही
अनं जनतेला मारल्याशिवाय
ह्यांना मरण येत नाही......

म्हणे सुजाण नागरीक आम्ही
मतदान हे केलेच पाहिजे
पण का म्हणुन आणि कशासाठी....
ज्यांना मते देणार
ते तर तिकडे जाऊन
स्वत:चा आत्मा विकणार...
आहे का एकतरी सच्चा
आहे का एकतरी अच्छा
अहो चोरांचा बोलबाला हो...
बाकी... जनता काय करणार...!
अन् म्हणुन….
हे असेच चालू राहणार...!

कवि - सतिश चौधरी