Monday, March 22, 2010

स्वप्नातला गाव....!!

स्वप्नातला गाव....

स्वप्नातला गाव माझा
आज स्वप्न बनुन गेला
विसरत गेलो, विसरत चाललो
विसरुन गेलो मी त्याला...
स्वप्नांहुनही किती सुंदर
ह्या क्रुत्रिम शहरांपेक्षा
निसर्ग तेथे वास्तव्याला होता
हिरवी हिरवी गार पालवी
नदी नाल्यांची भांडणं होती
मुले ती तेथे झुला झुलवी
सकाळी सकळी मंदिरात
घंटा वाजत जायची
गाव माझा जागत होता
मंडळी भजन गायची
ते रस्ते करड्या मातीचे
खड्ड्यांचे कुठे दगडांचे
पण पावलांना आपले वाटे
मायेच्या पाऊलवाटांचे....
लोकांच्या जगण्यामध्ये
एक वेगळीच तर्हा होती
फाटके होते खिसे जरी
जगण्याची दौलत होती
त्याच माझ्या गावाला
सोडुन आलो कधीचा
नौकरीसाठी,पैशासाठी
म्हटलं कधी कधी चक्कर मारु
एकदिवस आपल्या गावाकडे
किती वर्ष निघुन गेले
पण तो दिवस आला नाही
गाव माझा बोलावतो आहे
मजला कधीचा...
तो उनाड रस्ता तसाच आहे
माझ्या बालपणीचा...
काहिच नाही बदललं अजुनही तेथे
मी मात्र बदललो...
काल स्वत:मध्ये गुंफलो होतो
आज संसारी गुंफलेलो...
माहित नाही आज तेथे
कसा काय हाल असेल...
स्वप्नांमधला गाव माझा
कदाचीत स्वनांतच दिसेल.....

-- सतिश चौधरी

No comments:

Post a Comment